श्री मंगलमूर्ती

श्री मंगलमूर्ती

॥ श्री भूस्वानंदाधीशो मयुरेश्वरो विजयते ॥

प्रियन्तां खलु गाणपत्यपथगाः श्रीमोरयायोगिनो ।
यैर्भ्रष्टं जगतीतलं विमलतां कीर्त्या हि नीतं पुरा ।
तेऽद्य श्रीपवनातटे सुविमले कुर्वन्ति वासं चिरम्‌ ।
रक्षन्त्वेव सदा सुमार्गजुषतस्तान्‌ मोरयान्‌ प्रार्थये ॥

एकदा श्री मोरया गोसावी नेहमीप्रमाणे वारीसाठी मोरगावला गेले. तिथे देवळात मयूरेश्वराचे ध्यान करीत असता सिद्धिबुद्धिसहित श्रीमयूरेश्वराची मूर्ती त्यांच्या पुढे उभी राहिली. ते तेजस्वी ध्यान पाहताच मोरया गोसावींना अतिशय आनंद झाला व त्यांनी श्रीमयूरेश्वरांच्या चरणी साष्टांग दंडवत घातले. त्यांना उठवून श्रीमयूरेश्वरांनी सांगितले की, “आता तू वृद्ध झालास, यात्रेस येताना तुझे फार हाल होतात. ते हाल माझ्याच्याने पहावत नाहीत. तुझी यात्रा मला पावली. या पुढे तू यात्रेस येऊ नकोस. आता मीच तुझ्याबरोबर चिंचवडला येतो. उद्या गणेशकुंडात स्नान करताना तुला तेजस्वी व शेंदरी रंगाचा एक तांदळा मिळेल. ते माझेच स्वरूप आहे, तो तांदळा घेऊन चिंचवडला जा. या नंतर तो तांदळा घेऊन फक्त भाद्रपद, माघ महिन्याच्या शुद्ध चतुर्थीसच वारीस येत जा. आता तू आणि मी वेगळे नाही. तुझ्या भक्‍तीमुळे आपल्यातील द्वैता-द्वैत आता नष्ट झाले आहे. असा आशीर्वाद देऊन श्रीमयूरेश्वर अंतर्धान पावले.

दुसऱ्या दिवशी मोरया गोसावींनी कऱ्हा नदीमधल्या गणेशकुंडात स्नान केले. स्नानानंतर सूर्यास अर्घ्य देत असताना दुसऱ्या अर्घ्याच्या वेळी त्यांच्या ओंजळीत शेंदरी रंगाचा, अत्यंत तेजस्वी असा तांदळा प्राप्त झाला, मोठ्‍या समारंभाने श्री मोरया गोसावींनी ती प्रसादमूर्ती (तांदळा) श्रीमयूरेश्वरांच्या मंदिरात आणली. ती प्रसादमूर्ती मयूरेश्वरांपुढे ठेवून आर्त भावनेंने प्रार्थना केली. त्या वेळी सर्वांच्या देखत श्री मयुरेश्वराच्या गळ्यातील हार मोरया गोसावींच्या गळ्यात पडला. ही घटना ई.स १४८९ मध्ये घडली. भजन करीत करीत श्री मोरया गोसावी महाराज ती प्रसादमूर्ती घेऊन चिंचवडला आले. दुसऱ्या दिवशी त्या मूर्तीची यथाशास्त्र प्राणप्रतिष्ठा केली. हीच प्रसादमूर्ती सध्या चिंचवडला श्रीमंगलमूर्ती वाड्‍यात (देऊळवाड्‍यात/ देव वाड्यात) दर्शनास आहे.