एके दिवशी एका शेतकऱ्याने आपल्या खडकाळ जमिनीजवळ श्रीमोरयांस नेऊन त्यांची भक्तिपुरःस्सर विनवणी केली की, महाराज आपल्या चरणधूलीनें माझी जमीन सुपीक व्हावी. तेव्हा श्रीमोरयांनी आपला चरणस्पर्श केला तेव्हापासून ती फार सुपीक झाली.
श्रीमोरया आपल्या गुरूच्या आज्ञेवरून अनुष्ठानाकरिता मोरगांवाहून थेऊरास जात असतां वाटेंत लागणाऱ्या आठ कोसांवरच्या एका डोंगरावर एक महान् भुजंग वस्ति करून राहत असे; असे वृत्त त्यांचे कर्णी आले. तो सर्प मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना दंश करून त्यांचा प्राण घेत असे. त्यामुळे कोणीही प्रवासी तिकडून जाण्यास बहुधा धजत नसत, असे असतांही श्रीमोरया त्याच वाटेने श्रीमंगलमूर्तीचे नामस्मरण करीत चालले. सर्पाने ते जवळ आले असे पाहून एकदम फूत्कार करून त्यांचे आंगावर उडी घेतली व त्यांच्या पायास कडकडून दंश केला. परंतु श्रीमोरया भजनरंगांत अगदी गुंग होऊन गेल्यामुळे त्यांची वृत्ति – “ब्रह्मानंदीं लागली टाळी, कोण देहातें सांभाळी” याप्रमाणे झाली होती ह्मणून सर्पदंशाचे त्यांना भानही नव्हते. मग विषबाधा कोठून होणार? परिसाचा स्पर्श लोहास होतांच जसे त्याचे सुवर्ण बनते. तसे मोरयांच्या पदरजस्पर्शाने त्या भुजंगाला आपल्या पूर्वजन्मींच्या ज्ञानाची जागृति झाली. त्याने आपला दुष्ट देह श्रीमोरयांचे चरणी विसर्जन करून मुक्ति घेतली व उद्धरून गेला.
व्याघ्र शिलारूप झाला.
श्रीमोरयांनीं थेऊर येथे गेल्यावर अनुष्ठानास आरंभ केला. तो श्रीचिंतामणि यांनी त्यांची कसोटी पाहण्याकरिता एक महाक्रूर व्याघ्र त्यांच्या अंगावर सोडला. परंतु श्रीमोरयांच्या समाधिवृत्तींत यत्किचित् चलबिचल झाली नाही. उलट श्रीमोरयांचा अंगस्पर्श त्या व्याघ्रास होताच तो तात्काळ शिलारूप झाला व उद्धरून गेला. ती शिला अद्याप थेऊर येथे कायम आहे.
शेतकऱ्याच्या जन्मांध मुलीस दिव्यदृष्टि
एकेदिवशी श्रीमोरयागोसावी ताथवडे गांवाजवळील किवजाई देवीच्या देवळातून अनुष्ठान संपवून श्रीच्या धूपारतीसाठी विस्तव आणण्याकरिता जवळ असलेल्या पवाराच्या शेतांतील कोपीत गेले. त्यावेळीं पवाराची मनुष्ये रानांत गेली होती व घरी एक जन्मांध कन्या राहिली होती. तिच्याजवळ श्रीमोरयांनी अग्नि मागितला. तेव्हा तिने मी आंधळी असल्याने विस्तव देण्यास असमर्थ आहे असे सांगितले. त्यावरून त्या योग्याने ‘श्रीगजानन कृपेने तुला दिसूं लागेल. तूं विस्तव लौकर आणून दे.‘ असे सांगितले ती विस्तव देण्यास उठतांच तिला दिव्यदृष्टि प्राप्त झाली व तिने तत्काळ अग्नि आणून श्रीमोरयागोसावी यांस दिला व त्यांचे चरणी लीन झाली.
पवार स्त्रियेस पुत्रप्राप्ति झाली
ताथवडे गांवचा तुकाराम पवार नांवाचा दुसरा एक गृहस्थ श्रीमोरयांच्या अनुष्ठानस्थला जवळच राहत होता. तो एकेदिवशी श्रीदर्शनास आला व प्रार्थनाकरून ह्मणाला की, महाराज मला आपली कांही सेवा घडावी ह्मणून मी श्रीमंगलमूर्तीच्या नैवेद्याकरिता दूध आणून देत जाईन. त्याचा स्वीकार व्हावा. ही त्याची विनंति श्रीमोरयांनी मान्य केली. त्या पवाराचा दूध देण्याचा नित्यक्रम चालला असता एके दिवशीं त्याचे बायकोस दूध पोचविण्याचा विसर पडला. सायंकाळीं स्मृति होताच ती दूध घेऊन पर्णकुटिकेत आली. त्यावेळी मोरयांनीं तिला सहज विचारलें कीं, तुला पुत्र किती आहेत ? ते ऐकतांच तिला अत्यंत गहिंवर येऊन रडें कोसळले. व ती ह्मणाली महाराज मला मूलबाळ काहीच नाही. श्रीमोरयांनी तिची ती अवस्था पाहून कळवळून श्रींचा प्रसाद देऊन तुझी मनकामना लौकरच श्रीगजानन पूर्ण करितील असा आशीर्वाद दिला. पुढे कांही दिवसांनी तिला पुत्र पराप्ति झाली. त्यावेळी पवाराने त्यास जमीन इनाम दिलेली अद्याप त्यांचे वंशजाकडे उपभोगास आहे.
अपकाऱ्यावरही उपकारच केला
एकेदिवशी मध्यरात्रीच्या सुमारास सुरुत्र गांवी राहणाऱ्या नरहरी महिपती या नांवाच्या व्यक्तीने श्रीमोरयांची ध्यानस्थ वृत्ति खरी आहे किंवा खोटी आहे हे पाहण्याकरिता मुद्दाम दुष्टपणाने ते ध्यानस्थ असता त्यांच्या पर्णकुटिकेस एकाएकी आग लाविली. सर्व पर्णकुटिका जळून खाक झाली. परंतु सद्गुरु मोरया आपल्या जागेवरून लवलेश हालले नाहीत. अग्नीने त्यांच्या शरीरास बिलकूल इजा केली नाही. समाधी विसर्जन केल्यावर त्यांना असे कळून आले की, हे सर्व कृत्य नरहरीने परीक्षा पाहण्याकरिता मुद्दामच केले होते. तथापि ह्या कृत्याचा त्यास पश्चात्ताप झाल्यावर तो त्यांस शरण आला. तेव्हा श्रीमोरयांनी त्यास क्षमा करून असा पुन्हा कोणाचा व्यर्थ छल न करण्याविषयी उपदेश केला. अशा प्रकारची ज्याची एकतान वृत्ती झाली त्याला पीडा करणारा ह्या अखिल ब्रह्मांडांत कोण समर्थ आहे ? अशा त्या विकाररहित पुरुषाला कोणापासून भय आहे ? भयसारे द्वैतपणांत असते, जे दुज्याभावास गिळून बसले ते जगांत निर्भयच होत
अन्नपूर्तता केली
श्रीमोरयांच्या लग्नसमारंभ समयी त्यांच्या श्वशुराने आपल्या सामर्थ्यानुरूप शंभर सव्वाशे पानांचे साहित्य चिंचवड येथे बरोबर आणिले होते. परंतु तेथे आल्यावर त्यास असे वाटले की, आपण आणिलेल्या भोजनाच्या साहित्यांत लग्नसमारंभा करिता जमलेल्या मंडळींचा समावेश होणार नाही. ह्मणून त्यास फार काळजी उत्पन्न झाली. हे श्रीमोरयास समजतांच त्यांनी त्यांस बोलावून आणून सांगितले की, तुह्मास काळजी करण्याचे बिलकूल कारण नाही. श्रीमंगलमूर्ती असलेल्या साहित्यांत सर्व पार पाडतील. तुम्ही स्वयंपाक सिद्ध झाल्यावर मला कळवा. त्याप्रमाणे त्यांच्या सासऱ्याने स्वयंपाक सिद्ध झाल्याचे येऊन सांगितले. नंतर श्रीमोरयांनी स्वहस्ते श्रीमंगलमूर्तीस नैवेद्य समर्पण करून स्वयंपाकगृहांत येऊन सर्व स्वयंपाक अवलोकन केला व त्यावर तीर्थ सिंचन करून पात्र मांडण्यास आज्ञा दिली. थोडक्याच वेळांत ब्राह्मणांच्या शेंकडो पंक्ति जेवून उठल्या. नंतर त्यांनीं इतर जातीस प्रसाद वाटला आणि स्वयंपाकघरांत जाऊन पाहतात तो पूर्वसिद्ध अन्न जशाचे तसंच कायम आहे. मग सर्वांनीं उर्वरित प्रसाद भक्षण करून श्रीमंगलमूर्तीच्या नांवाचा जयघोष केला.
महापुराचे उल्लंघन केले
एकेवेळी पर्जन्य काळांत श्रीमोरयागोसावी नित्याप्रमाणे मोरगांवी वारीस चालले असता वाटेत अंबी गांवाजवळ येऊन पोहोचले तो कऱ्हानदीला महापूर आला असे त्यांनी पाहिले. रात्र अंधारी. मोरगांवी तर वेळेवर गेलेच पाहिजे. तेव्हा आता काय करावे या चिंतेत ते पडले. शेवटी कृतनिश्चय करून त्यांनी श्रीमंगलमूर्तीच्या नांवाचा गजर केला व पाण्यांत शिरले तो त्यांस कोणी उतरून पलीकडे नेत असल्याचा भास झाला. नदी उतरून पार झाले तो त्यास मांड्या इतके पाणी लागले असून ज्याने हात धरला होता तो कोठे दिसेना. तेव्हा श्रीमंगलमूर्तीनीच आपल्यास साह्य केले असे जाणून ते त्या आनंदांत झपाट्याने निघून मोरगांवी आले
देवद्वाराची कुलुपे गळून पडली
वर लिहिल्याप्रमाणे मोरगांवी श्रीमोरयागोसावी दाखल झाले तो बरीच रात्र झाल्याकारणाने पूजाऱ्यांनी देवालयास कुलुपे लावून ते घरोघर गेले. आता आपली पूजा अंतरली म्हणून श्रीमोरयांच्या चित्तास फारच उद्विग्नता वाटली. तोच अद्भुत करणी होऊन देवालयाची सर्व कुलुपे पटापट पडून दारे उघडली. नंतर श्रीमोरया आत गेले श्रीमोरेश्वरांची कोणी महापूजा केलेली होती ती त्यांनी एके बाजूस काढून ठेवून यथासांग पूजा केली. आणि आपण बाहेर आले तोच कुलुपे पूर्ववत् लागली. पहाटेस पुजारी येऊन दारे उघडून पाहतात तो श्रीमंगलमूर्तीची रात्रौ केलेली महापूजा कोणी दूर काढून ठेवून नवी पूजा केलेली आहे असे त्यांस दिसून आले. शोधा अंती त्यांना समजले की चिंचवडचे मोरयागोसावी आले आहेत. त्यांनीच ही पूजा केली असावी ह्मणून त्यांनी त्यांस भेटून विचारले तेव्हा श्रीमोरयांनी रात्रौ घडलेला सर्व चमत्कार त्यांस निवेदन केला. तेव्हांपासून श्रीमोरयांनी पूजा केल्याशिवाय पुजारी देवळास कुलुपे घालीनासे झाले. भक्तासाठी श्रीमंगलमूर्तीनी ज्या अघटित लीला केल्या त्या कोठवर वर्णाव्यात!
कुष्टी ब्राह्मण दिव्यदेही केला
पुढे एकेप्रसंगी चतुर्थीस श्रीमोरया वारीकरितां मोरगांवी जाण्यास निघाले. वाटेंत एक गलितकुष्ठ पापी त्यांचे नजरेस पडला त्यांनी मोरयाजवळ पाणी प्यावयास मागितले. तेव्हा त्यांना त्याची कींव येऊन त्यांनी त्यास पाणी आणून पाजिले. थोडे उदक अंगावरही सिंचन केले. त्यामुळे त्याची तहान भागून देहहि दिव्य झाला. सर्व व्याधि क्षणार्धात नष्ट झाल्यामुळे त्यांनी श्रीमोरयांची अनन्यभावे स्तुति केली व मला आपल्या चरणांची कांही सेवा घडावी अशी इच्छा दाखविली. त्यावरून श्रीमोरयांनी त्यास श्रीमयुरेश्वराचा नामोच्चार करीत जा व प्रतिमासी चतुर्थीस मोरगांवी वारीस येत जा, अशी आज्ञा केली व आपण पुढे निघून गेले. श्रीमोरयासारखा महाभक्त त्या ब्राह्मणास धन्वंतरी मिळाल्यावर त्याची व्याधी नष्ट व्हावी हे अगदी साहजिक आहे.
ब्राह्मणाची पोटशूळ व्यथा घालविली
श्रीमोरयागोसावी एके दिवशी वारीस गेले असता एका वृक्षाखाली एक ब्राह्मण पोटशूळाचे व्यथेने फार व्याकुळ होऊन मुर्छित पडलेला त्यांनी पाहिला. तो व्यथेने जर्जर होऊन परमेश्वराचा धांवा करीत मोठ्याने आक्रोश करीत होता. त्याचे ते करुणालाप ऐकून श्रीमोरयांचे चित्त फारच द्रवले. त्यांनी आपल्या हाताने त्याचे पोट चोळले. चमत्कार असा झाला की, त्याचे पोट दुखणे क्षणार्धात कमी पडून तो चांगला बरा झाला. नंतर त्याने उठून श्रीमोरयांस आभारपूर्वक नमस्कार केला व ह्मणाला ‘महाराज माझी जन्माची व्यथा आज आपल्या हस्तस्पर्शाने निरसन झाली. माझे मागे प्रपंचपाश वगैरे कांही नाही. तेव्हा मला या आपल्या चरणाचा अंतर पडू देऊ नये. येवढी माझी नम्रतापूर्वक विनंति आहे. त्यावर “तूं गणेशभजन कर व तुझी इच्छा असल्यास येथेंच प्रतीमासी भेट घेत जा” असे सांगून ते पुढे निघून गेले
© 2026 श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper
