परंपरा

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांची वंश परंपरा

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या तपश्चर्येमुळे चिंचवडला अष्टविनायकांइतके महत्त्व प्राप्त झाले आहे. या मंदिरातील सर्व समाध्यांचे दर्शन घेतल्याने अष्टविनायक दर्शनाचा एकाच ठिकाणी लाभ होतो. महाराष्ट्रातील गणपतीच्या प्रमुख साडेतीन पीठांपैकी मोरगाव, राजूर आणि पद्मालय हे पूर्ण तर चिंचवड हे अर्धपिठ आहे.

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज

कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव होते. त्या गावी श्रीवामनभट्ट शाळिग्राम आणि त्यांची पत्‍नी पार्वतीबाई नांदत होते. देशस्थ ऋग्वेदी, हरितस गोत्राचे वैदिक असलेले, श्रीवामनभट्ट व त्यांच्या पत्नी सौ.पार्वतीबाई ह्या पतिव्रता व ईश्वरनिष्ठ होत्या. परंतु एक दु:ख त्यांच्या मनाला जाळत होते, त्यांना पुत्र संतान नव्हते. पुत्रप्राप्तीच्या मार्गात काही अडथळा असल्यास तो दूर करण्यासाठी त्यांनी तीर्थयात्रा करण्याचे ठरवले. पत्‍नी बरोबर तीर्थयात्रा करत ते इ.स.१३२४ मध्ये मोरगावला आले. मोरगावला ‘भूस्वानंद’ म्हणतात. श्री वामनभट्ट यांनी ठरवले की पुत्र प्राप्ती साठी संकल्प करून अनुष्ठान करायचे, व तपश्चर्या करून श्रीमयूरेश्वराला प्रसन्न करून घ्यायचे. असा संकल्प करून त्यांनी अनुष्ठानास प्रारंभ केला. अश्याप्रकारे त्यांनी ४ तप {४८ वर्ष} अनुष्ठान केले. एकेदिवशी पहाटे साक्षात तेजोनिधी मयूरेश्वर त्यांच्या समोर प्रकट झाले व म्हणाले “वामना तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे तुझ्या नशिबी जरी पुत्र नसला, तरी मी पुत्र रूपाने तुझ्या पोटी अवतार घेईन व जगाचा उद्धार करेन”. वामनभटांची तपश्चर्या फळाला आली. भक्तीच्या वेलीला साक्षात्कारचे फूल उमलले. प्रत्यक्ष मयूरेश्वर पुत्र रूपाने आपल्या घरात नांदणार या परते भाग्य कुठले?

थोड्याच दिवसात पार्वतीबाई गर्भवती झाल्या व नवमासपूर्ण होताच श्री शालिवाहन शके १२९७ ई.स १३७५, विधातरू नाम संवत्सर, माघ शुद्ध चतुर्थी, शुक्रवारी, रेवती नक्षत्र, द्वितीय चरण माध्यान काळी पार्वतीबाई प्रसूत झाल्या. मयूरेश्वर रूपाने मुलाची प्राप्ती झाली, मुलाचे नाव ‘मोरेश्वर’ असे ठेवले सर्वजण प्रेमाने त्याला ‘मोरया’ म्हणत. वयाच्या ८ व्या वर्षी मोरयांची मुंज झाली. मोरया रोज त्रिकाल संध्या, गायत्री जप, सूर्योपासना, अग्निउपासना आणि अनुष्ठान करण्यात मग्न होऊ लागले. त्यांनी अष्टविनायक यात्रा करण्याचे ठरविले.

अष्टविनायकातील प्रत्येक क्षेत्री ते अनुष्ठान करीत व त्या गणपतीचे तेज आपल्या हृदयात साठवून ठेवत व पुढे जात. या मागे भविष्यातील एक संकेत होता. गणेशभक्तांना अष्टविनायकांचे दर्शन एकाच ठिकाणी घडावे हा हेतु होता. स्वतः मोरया गोसावी गणपतीचे अवतार होते व पुढील सात पिढ्यांमध्ये गणेशाचे अंशरूपाने अस्तित्व होते. अष्टविनायक यात्रा पूर्ण होताच श्री मोरयाना श्री सदगुरू नयनभारती गोसावी यांचे रूपाने सद्गुरु प्राप्ती झाली. व त्यांना श्री नयनभारती गोसावी यांनी कफनी, रुद्राक्षाची माळ, कमंडलू दिले व मंत्रउपदेश देत श्री मोरयांना नाथपंथ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यामुळे लोक त्यांना ‘गोसावी’ संबोधू लागले. त्याचवेळी श्री मयूरेश्वराने दृष्टांत दिला की, “तू आता पवना नदीच्या तिरावर असलेल्या चिंचवड गावी जाऊन रहा आणि दर महिन्याच्या विनायकी चतुर्थीस मोरगाव वारीस येत जा”. त्यानंतर मोरया चिंचवडला आले, व त्यांनी ताथवडे येथील केजूबाई मंदिर येथे वास्तव्य केले. मयूरेश्वराच्या आज्ञे प्रमाणे श्री मोरया गोसावी महाराज चिंचवड ते मोरगाव वारी करू लागले. श्री मयूरेश्वराच्या आज्ञे प्रमाणे श्री मोरयांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला व वयाच्या ९६ व्या वर्षी विवाहबद्ध झाले. त्यांच्या पत्नीचे नाव उमा असे ठेवले. पुढे श्री थेउरच्या चिंतामणीने आशीर्वाद दिल्या प्रमाणे वयाच्या १०४ व्या वर्षी श्रीमोरया व उमा मातांच्या पोटी श्री चिंतामणीने जन्म घेतला. श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज वयाच्या ११७ व्या वर्षापर्यंत मयूरेश्वराची आराधना करत न चुकता मोरगावची वारी करत होते. पण वयोवृद्ध झाले कारणाने एकदा त्यांना वारीला जाताना मोरगावास पोहोचायला उशीर झाला. मंदिराचे दार पूजाऱ्यांनी बंद केले होते. श्री मोरया तिथेच असलेल्या तरटीच्या झाडाखाली बसून व्याकूळ होऊन मयूरेश्वरचा धावा करू लागले, त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. “तुझीये भेटीची बहू आस रे मोरया, देखीता बहुत झाले दिवस रे मोरया” हा धावा मयूरेश्वरानी ऐकला व पालनहार श्री मयूरेश्वर मोरयांच्या समोर प्रकट झाले व मोरयांना म्हणाले, “अरे मोरया कशासाठी एवढा अट्टहास करतोस, आपल्यातले द्वैताद्वैत संपले आहे. आपल्या दोघांमध्ये कोणताच भेद उरला नाही. तू आणि मी एकच आहोत”, असे म्हणून श्री मयूरेश्वराने त्यांना सांगितले, “तू आता वृद्ध झालास, मोरगावास येताना तुझे फार हाल होतात, ते माझ्याच्याने पाहवत नाहीत, तुला आता मोरगावास येण्याची गरज नाही, मीच तुझ्या बरोबर चिंचवडला येतो”. दुसऱ्या दिवशी कऱ्हा नदीत सूर्याला दुसरे अर्घ्य देत आसताना तांदळा रूपी श्री मंगलमूर्ती हातात प्रकट झाले, आणि त्याचवेळी आकाशवाणी झाली, “ हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील ” आणि तेव्हा पासून, “मंगलमूर्ती मोरया” हा जयघोष प्रचलित झाला. श्री मोरया गोसावी महाराज हे श्री मयुरेश्वराचे अवतार होते, त्यामुळे महाराष्ट्रात आज जी गाणपत्य संप्रदायाची उपासना दिसते त्याचे ते प्रवर्तक मानले जातात.

हळूहळू चिंचवडचा पसारा वाढला. अन्नदानाला श्री मोरया महाराज फार महत्व देत. अन्नसत्र, यात्रा-उत्सव, पूजा-अर्चा यामुळे चिंचवड सदाच गजबजू लागले. श्री मोरया गोसावी महाराज यांना जनसंपर्कामुळे साधनेत व्यत्यय येत होता. त्यांनी मयूरेश्वरा कडे संजीवन समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली. श्री मयूरेश्वराने त्यांना परवानगी दिली. त्यांच्या आज्ञेनुसार ई.स. १५६१, मार्गशीर्ष वद्य षष्ठी रोजी चिंचवडला पवनेच्या काठी त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्यावेळी श्री महाराजांचे वय १८६ वर्ष इतके होते. पवनेचा काठ पवित्र झाला. दर्शनासाठी भक्‍तांची पावले चिंचवड कडे वळू लागली.

श्री चिंतामणी महाराज देव (थोरले)

श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांनी आपले अवतार कार्य संपवून मार्गशीर्ष वद्य षष्ठी, ई.स. १५६१ रोजी पवना तटी योगमार्गाने संजीवन समाधी घेतली. त्यानंतर त्यांची परंपरा त्यांचे सुपुत्र श्री चिंतामणी महाराज यांनी चालविली. श्री चिंतामणी महाराजांचा जन्म ई.स. १४८१ मध्ये झाला. श्री मोरया गोसावी समाधिस्थ झाले, त्या वेळी श्री चिंतामणी महाजांचे वय ८० वर्षाचं होते. तेही श्री मोरया गोसावी महाराजांप्रमाणेच थोर गाणपत्य व अधिकारी पुरुष होते. त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. त्या सिद्धीच्या जोरावर त्यांनी अनेक भक्तांची दुःखे दूर करून त्यांच्या मनोकामना पूर्ण केल्या व त्यांना भक्तिमार्गाला लावले. वडिलांप्रमाणेच तेही अत्यंत विरक्त होते. आठव्या वर्षी श्री मोरया गोसावी महाराजांनी श्री चिंतामणींची मुंज केली, त्या वेळी चिंतामणींची गायत्रीमंत्राचा उपदेश केला. गायत्रीमंत्राबरोबरच श्री मोरया महाराजांनी त्यांना सूर्योपासना व गणेशोपासनेचा उपदेश केला. नंतर गुरुगृही जाऊन श्री चिंतामणी महाराजांनी वेदाध्ययन पूर्ण केल्यावर त्यांनी यथाविधि गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. वयाच्या ८० व्या वर्षांपर्यंत त्यांनी मोरया गोसावीच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मसाधना केली. श्रीमोरया गोसावी हेच त्यांचे मोक्षगुरु होते. वयाच्या १२० व्या वर्षी म्हणजेच ई.स. १६०१ मध्ये त्यांना पुत्रप्राप्ती झाली. मुलाचे नाव ‘नारायण’ असे ठेवले.

एके दिवशी चिंतामणी महाराजांना भेटायला म्हणून तुकाराम महाराज व समर्थ रामदास स्वामी आले होते. महाराजांनी त्यांचे स्वागत केले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर चिंतामणी महाराजांनी त्यांना भोजन प्रसादाचा आग्रह केला. तुकाराम महाराजांनी व समर्थांनी आपल्याजवळ आणखी दोन पाने मांडायला सागितली. सर्वजण जेवायला बसले.

तुकाराम महाराज चिंतामणी महाराजांना म्हणाले की, मी विठ्ठल-रखुमाईला बोलावतो. समर्थ रामदास म्हणाले मी श्रीराम व सीतामातेला बोलावतो. सर्वजण जेवायला बसले. आवाहन करताच पांडुरंग – रुक्मिणी, श्रीराम – जानकी प्रसादास आले. त्या वेळी तुकाराम महाराज चिंतामणी महाराजांना म्हणाले, “आता आपण गणपतीला जेवायला बोलवावे.”

चिंतामणी महाराजांनी गणपतीचे ध्यान करून त्यांना आवाहन केले, आणि चिंतामणी महाराजच साक्षात गणपती झाले. सर्वांना त्यांचे अंगी गणपतीची मूर्ति दिसू लागली, त्यांना सोंड आली होती, मस्तकावर सोन्याचा रत्नजडित मुकुट होता. त्यावर दूर्वांकुर शोभा देत होते. चार हातात पाश अंकुश इत्यादि आयुधे शोभत होती. त्यांनी लाल रंगाचे वस्त्र नेसले होते. एकदन्तामुळे त्यांची शोभा द्विगुणित झाली होती. एका हातात ब्रह्मरसाचा मोदक होता व दुसऱ्या हातात अभ्यंकर होता. श्री चिंतामणी महाराजांना अशा तेजस्वी गणपती रुपात पाहून, देव व भक्ताचे ते अद्वैत रूप पाहून, सर्वजण नतमस्तक झाले. तुकाराम महाराजांनी श्री चिंतामणी महाराजांची स्तुती केली. ते स्तुतिपर पाच अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आढळतात. चिंतामणी महाराज मात्र अद्वैत अवस्थेला पोचले होते. गणपति व ते एकच होते. तुकाराम महाराज म्हणाले, “तुम्ही तर प्रत्यक्ष देवच आहात. आजपासून लोक तुम्हाला ‘देव’ म्हणतील” आणि तेव्हापासून चिंतामणी महाराजांचे शाळिग्राम आडनाव मागे पडून देव हे आडनाव रुढ झाले.

आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांना देखील संजीवन समाधी घेण्याची इच्छा होती, परंतु श्री मोरया गोसावी महाराजांनी त्यांना दृष्टांत देऊन तसे न करण्यास सांगितले. आपल्या सद्गुरू च्या आज्ञेनुसार त्यांनी आपला निर्णय बदलला. त्यांनी आपल्या समाधीसाठी श्री मोरया गोसावी महाराजांच्या समाधी शेजारीच एक गुहा तयार करवून घेतली होती, व आपल्या मुलास सांगितले की माझ्या मृत्यूनंतर माहे दहन याच गुहेत करावे. त्यानुसार ज्यावेळी त्यांच्या देहाचे दहन करण्यात आले, त्यावेळी त्याजागेवर श्री गणेशाची प्रतिमा उमटली. ती आजही आपल्याला पहावयास मिळते.

श्री नारायण महाराज देव (थोरले)

श्री नारायण महाराज हे चिंतामणी महारांजाचे जेष्ठ पुत्र असल्यामुळे, गादीचा वारसा त्यांच्या कडे आला. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी पण अनेक चमत्कार करून, व लोकांची दु:ख दुर करून, त्यांना भक्तीमार्गात आणि गणेश संप्रदायाकडे वळविले. श्री चिंतामणी महाराजांप्रमाणे श्री नारायण महाराजांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. त्या काळातील अनेक राज्यकर्त्यांना व सरदारांना संस्थानच्या मिळकती मधुन त्यांनी आर्थिक मदत केली व त्यांचे मनोधैर्य वाढविले. त्यामुळे राज्यकर्त्यांनी देखील देव संस्थानला अनेक इनामे दिली. श्री नारायण महाराजांच्या कारकिर्दीत संस्थानला भव्य स्वरुप प्राप्त होऊन, श्री गणेश संप्रदायाची कीर्ती चारी बाजूला पसरली.

श्री नारायण महाराज हे राजगुरू होते. राष्ट्र, धर्म यांचा त्यांना कधीच विसर पडला नाही. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे स्वराज्य उभे रहावे यासाठी त्यांनी सर्वतोपरी मदत केली. जिजाबाई बालशिवाजीला घेऊन अनेक वेळा चिंचवडला येत. गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांना गुरु केले. छत्रपतींनी रघुनाथ पंडितांकडून राज्यव्यवहार कोश करवून घेतला त्याच्या सुरवातीलाच पुढील श्लोक आला आहे.

यः सिद्धिमावहति चिंचवडाधिवासी हेरंबपादभजनेन महानुभावः ।
नारायणभिधसुधीतिलकादवाप तस्मादनुग्रहमसौ शिवसार्वभौमः ।।

अर्थ : हेरंभाच्या भजनाने जो सिद्धी मिळवून देतो, अश्या चिंचवड निवासी नारायण नावाच्या अत्यंत बुद्धिमान, श्रेष्ठ महानुभावांकडून शिवसार्वभौमाला अनुग्रह मिळाला.
त्याच ग्रंथात आणखी एक श्लोक आहे,

चिन्तामण्यवतार एव भगवान् यः पावनारोधसि ग्रामे चिंचवडाभिधे वितनुते वासं सतामग्रणीः।
लोकानुग्रहकारिणं गजमुखध्यानाप्तसिद्ध्यष्टकम् श्रीनारायणदेवमनिशं सेवे तमिष्टार्थदम् ।।

अर्थ : चिंतामणीचा अवतार असणारे, सज्जनांमध्ये श्रेष्ठ असे पवना नदीच्या काठावर चिंचवड गावी वास असलेले लोकांवर कृपा करणारे, गणेशाच्या उपासनेने जयाने अष्टमहासिद्धि प्राप्त करून घेतल्या आहेत, अशा मनोरथ पूर्ण करणाऱ्या नारायण देवाची मी सतत सेवा करतो. ह्यांनी आपले अवतार कार्य ई. स. १७१९ संपविल्या नंतर, जेथे त्यांचे दहन केले त्या ठिकाणी श्री गणपतीची प्रतिमा उमटली आहे व शेजारी पत्नीला दिलेल्या वरा प्रमाणे तिचीपण प्रतिमा उमटली आहे.

श्री चिंतामणी महाराज (दुसरे)

जन्म ई.स. १६७५ समाधी ई. स. १७३६

श्री नारायण महाराजांनंतर त्यांचे जेष्ठ पुत्र श्री चिंतामणी महाराज हे गादीवर आले. त्यांनी आपले संपूर्ण जीवन हे श्री मंगलमूर्तींच्या सेवेत घालविले. यांच्यात पण श्री गणेशांचा अंश होता. हे सत्पुरुष व साक्षात्कारी होते. यांच्या कार्यकाळात थेऊर येथील देवालयाचे काम पूर्ण झाले. त्या काळातील राज्यकर्त्यांकडून संस्थानला काही जमिनी इनाम म्हणून मिळाल्या. तसेच अनेक गावांची सरदेशमुखी मिळाली. त्यामुळे संस्थांनचे उत्पन्न वाढले. त्यांनी अनेकांना श्री गणेश संप्रदायाकडे व भक्ती मार्गाकडे वळविले व गरजूंना आर्थिक मदत पण केली.

श्री धरणीधर महाराज देव

जन्म ई स. १७२५ – समाधी ई. स. १७७२

श्री धरणीधर महाराज, हे चिंतामणी महाराज (दुसरे) यांचे जेष्ठ पुत्र होते. वडिलांच्या हयाती मधेच त्यांना गादीवर बसण्याची आज्ञा झाली. हे पण आधीच्या परंपरे प्रमाणे साक्षात्कारी व सिध्द पुरुष होते. यांच्या कालखंडात साताऱ्याच्या शाहूमहाराजांना श्री मंगलमूर्तीचा द्रुष्टांत झाला व त्यांना श्रींच्या दर्शनास जाण्याची आज्ञा झाली. शाहूमहाराज मंगलमूर्तीच्या दर्शनासाठी निघाले असता, समोरुन श्री धरणीधर महाराज येत होते. त्या वेळी शाहूमहाराजांना समजले की, आपण स्वप्नात ज्यांचे दर्शन घेतले ते हेच आहेत. अंतरीची खुण पटताच दोघांनीही एकमेकांना साष्टांग दंडवत घातले. श्री धरणीधर महाराजांना राजकीय महत्व होते. त्यांच्या कारकिर्दीत चिंचवडला टांकसाळ सुरु झाली होती. त्यामुळे संस्थानच्या उत्पन्नात वाढ झाली. व अनेक समाजोपयोगी कामे करता आली. मोरगाव देऊळ, सिध्दटेक देऊळ, थेऊर देऊळ व चिंचवडच्या काळभैरवनाथाचे देऊळ बांधले.

श्री नारायण उर्फ गबाजी महाराज (दुसरे)

जन्म ई.स. १७४५ – मृत्यू ई.स. १८०२

श्री धरणीधर महाराजांनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री नारायण महाराज (दुसरे) हे शके १६९४ मध्ये गादीवर आले. त्यांचा जन्म शके १६६७ मध्ये झाला.. त्यांच्या पत्नीचे नाव अबई असे होते. त्यांना चिन्तामणी नावाचा एक मुलगा होता. श्रीनारायणमहाराज (दुसरे) हे थोर साक्षात्कारी सत्पुरुष होते. त्यांना सिद्धी अनुकूल होत्या. एकदा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी इंग्रजांवर स्वारी करण्याचेठरविले व नाना फडणवीस व सखारामबापू यांच्यासह ओझर येथे श्रींच्या दर्शनास गेले. त्यावेळी श्रींनी प्रसाद व आशीर्वाद दिला की तुम्ही विजयी व्हाल. त्याप्रमाणे युद्धात श्रीमंत माधवराव पेशवे विजयी झाले. परत येताना त्यांनी श्रींचे दर्शन घेतले व संस्थानला गाव इनाम करून दिले. ते अद्याप त्यांच्या वंशजांकडे चालू आहे. श्रीनारायणमहाराज यांनी ई.स. १८०२ मध्ये मार्गशीर्षात आपला देह ठेवला.

श्री चिंतामणी महाराज (तिसरे)

जन्म ई. स. १७७५ – समाधी ई. स. १८०५

श्री चिंतामणी महाराज (तिसरे) हे श्री नारायण महाराज (दुसरे) यांचे जेष्ठ पुत्र होते. श्री मोरया गोसावी यांच्या कुळातील परंपरे प्रमाणे, हे सातवे श्री गणेशाचा अंश असलेले थोर सिद्ध पुरुष होते. यांनी जास्त दिवस गादीचा उपभोग घेतला नाही. साधारण तीनच वर्षे हे गादीवर होते. ह्यांना पुत्र प्राप्ती नसल्याने ह्यांनी सिध्दटेक घराण्यातील गोविंद देव यांचा दुसरा मुलगा सखाराम देव यांस दत्तक घेतले व त्याचे नामकरण धरणीधर असे केले व गादीचा वारसा यांच्याकडे सोपविला.

गुरु नयनभारती गोसावी महाराज

श्री मोरया महाराज जेव्हा पाच वर्षाचा होते, तेव्हा त्यांच्या जिवावरील मोठे गंडान्तर टळले. गावात तापाची साथ सुरू होती त्या तापाने श्री मोरयाला गाठले. आईवडिलांनी खूप प्रयत्न केले. पण यश आले नाही. ज्या पुत्रासाठी आपण मोरेश्वराची अनेक वर्षे तपश्चर्या केली, तो पुत्रच आता हाती लागत नाही, असे समजून वामनभटांनी मोरेश्वराची प्रार्थना करण्यास सुरवात केली. थोड्याच वेळात एक गोसावी आला आणि मोरयाच्या बिछान्याजवळ येऊन तो म्हणाला, ‘देवा, हे काय?, अजून तुम्हाला अवतारकार्य पूर्ण करायचं आहे आणि इतक्यात काय चाललात?’ त्या गोसाव्याने आपल्या झोळीतील अंगारा मोरयाच्या कपाळाला लावला. त्या गोसाव्याचा स्पर्श होताच मोरया झोपेतून जागे व्हावे, त्याप्रमाणे ताडकन् उठून बसला. त्याने हात वर केला. तो गोसावी मोरयाच्या बिछान्यावर बसला व त्याने मोरयाच्या कानात गुरुमंत्र सांगितला. त्याला कफनी, रुद्राक्षाची माळ दिली. जाताना त्या गोसाव्याने वामन भटांना सांगितले, ‘तुम्ही अजिबात काळजी करू नका.’ श्री मोरयाना जीवनदान देणारे, हे होते चौदाव्या आखाड्याचे फिरस्ते गोसावी, योगिराज श्री नयनभारती महाराज.

श्री मोरयांच्या मनात विचार येई, की आपल्याला कोणीतरी सद्गुरू भेटावा. मोक्षगुरु भेटावा, सद्गुरूशिवाय साधना मफल होत नाही, सद्गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. मिळेल का मला सद्गुरू ? मनाची व्याकुळता दिवसेंदिवस वाढत होती. एके दिवस सकाळी मयूरेश्वराची षोडशोपचो पूजा करून मोरया गोसावी घरी निघाले होते. एवढ्यात बाहेरच्या ओवरीत त्यांना एक दिव्यमूर्ती दिसली. माथ्यावर जटाभार, मस्तकावर त्रिपुंडू, गळ्यात रुद्राक्षाची माळ, अंगात भगवी कफनी व पायात खडावा. अशी दिव्य मूर्ती पाहताच मोरया गोसावींचे पाय थबकले, मन विरघळू लागले. दोघांची दृष्टादृष्ट झाली. हृदयाचे संकेत हृदयाला कळले. धावत जाऊन मोरया गोसावींनी त्या साधूचे पाव घट्ट धरले. विरघळलेल्या मनाच्या गंगा यमुना डोळ्यातून वाहू लागल्या. त्यांनी सद्गुरुचरणांना स्नान घातले. मोरया गोसावी म्हणाले, ‘महाराज माझ्यावर कृपा करा, मला अनुग्रह द्या. शिष्य म्हणून माझा स्वीकार करा. ‘त्या साधूंनी मोरयांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला व तो साधू म्हणाला, ‘ जा, आजपासून तू सनाथ झालास. मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार केला आहे.’ या शब्दांनी मोरया गोसावींना अवर्णनीय आनंद झाला. ‘ नयनभारतींनी मोरया गोसावींना मंत्रोपदेश केला, ध्यानधारणादि योगसाधन शिकवले, षक्रिया, कुण्डलिनी जागृति, षट्चक्रभेदन समाधी अशा स्वरूपाचा संपूर्ण हठयोग शिकविला व आज्ञा केली की आता तू थेऊर क्षेत्री जाऊन तप कर. आम्हीही तीर्थयात्रेला जातो. सद्गुरूंचा विरह होणार या कल्पनेने मोरया गोसावींना अत्यंत दुःख झाले. ते म्हणाले, ‘महाराज तीर्थयात्रेला जाताना मला बरोबर घ्या. मी आपली सेवा करीन. माझी सेवा करण्याचा इच्छा अपुरी राहिली आहे. नयनभारती म्हणाले, ‘ अरे तू तीर्थयात्रेला येऊ नकोस. प्रवासात साधनेत अनेक अडथळे येतात. आता तुला माझी सेवाच जर करायची असेल तर थेऊरच्या चिंतामणीची सेवा कर. ‘ जड अन्तकरणाने मोरया गोसावींनी सद्गुरू नयनभारतींचा निरोप घेतला. निघताना मोरया गोसावींनी विचारले, ‘आता आपली पुनः भेट केव्हा होईल ?’ नयनभारती म्हणाले, ‘तू जेव्हा दर्शनाच्या इच्छेने स्मरण करशील, त्यावेळी मी तुला दर्शन देईन. काही वर्षांनी आयुष्याच्या उत्तरार्धात मी तुला चिंचवड येथे दर्शन देईन.’ योगिराज नयनभारती निघून गेले. अश्रुपूर्ण नेत्रांनी मोरया गोसावींनी त्यांना निरोप दिला.

श्री मोरया गोसावी आता आपले आयुष्य मंगलमूर्तींच्या उपासनेत घालवीत असत. एक दिवस मोरया गोसावींना आपल्या गुरुंची नयनभारतींची आठवण झाली. श्री मोरया गोसावींनी भेटण्याच्या इच्छेने तीव्रतेने गुरुंचे स्मरण केले. श्री मोरया गोसावींनी प्रेमाने दंडवत घातले व प्रार्थना केली, “महाराज, आता आपण चिंचवड क्षेत्रीच रहावे. मलाही आपले नित्य दर्शन होईल व गुरुसेवाही करता येईल.” त्यांनी मोरयांची प्रार्थना मान्य केली व चिंचवडला राहिले. मोरया गोसावींची गुरुसेवेची इच्छाही पूर्ण झाली. नंतर ई.स. १५५९ मध्ये नयनभारती यांचे महानिर्वाण झाले.

श्री विनायक उर्फ काका महाराज व श्री चिंतामणीचा तांदळा

श्री चिंतामणी महाराज यांचा चार पुत्र झाले. त्याप्रमाणे जेष्ठ पुत्र श्री नारायण महाराज हे श्री मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तींची पूजा करीत असत. श्री काका महाराज यांना देखील आपण श्रीमंगलमूर्तींची पूजा करावी असे वाटत असे,एकदा श्री काका महाराज श्री मंगलमुर्ती ना दुर्वा वाहण्यास गेले असता श्री नारायण महाराज यांनी त्यांना विरोध केला त्याचा श्री काका महाराज यांना राग आला व त्यांनी पण केला कि “दुसरा मंगलमुर्ती मिळवेन तेव्हाच चिंचवडात पाउल टाकेन” व ते थेट मोरगाव ला गेले व श्रीमयुरेश्वराची आराधना करू लागले श्री काका महाराज यांची भक्ती पाहून श्री मयुरेश्वराने दृष्टांत दिला की मी या आधी तुझ्या घराण्यात श्रीमंगलमूर्ती रुपी अवतरलो आहे तरी तू श्रीक्षेत्र थेऊर येथे जाऊन तपश्चर्या कर. त्याप्रमाणे श्री काका महाराज यांनी श्रीक्षेत्र थेऊर येथे जाऊन २१ दिवस नदीत उभे राहून उग्र तपश्चर्या केली,माशांनी शरीराचे लचके तोडले तरी देखील विचलित न होता तपश्चर्या चालू ठेवली, शेवटी श्री चिंतामणी प्रसन्न झाले व तांदळा रुपी श्री काका महाराज यांना प्राप्त झाले. त्याच वेळी जिंजीला छत्रपती राजाराम महाराज यांना दृष्टांत झाला कि,मी अवतरलो आहे माझी व्यवस्था कर मग श्री काका महाराज यांना थेऊर, जांबे, उरुळी, हिंजवडी हि गावे इनाम करून दिली. श्री काका महाराज मोठ्या इतमामात चिंचवड ला आले. श्री नारायण महाराज यांनी त्यांना स्वतंत्र वाडा बांधून दिला. व तेव्हा पासून भाद्रपद व माघ महिन्यात श्री चिंतामणीचा तांदळा घेऊन श्री काका महाराज यांचे वंशज यात्रेसाठी थेऊर येथे जाऊ लागले. सदर चिंतामणींचा तांदळा श्रीक्षेत्र चिंचवड येथे विराजमान आहे.